खान्देशजळगांवराजकीय

जळगाव विधान परिषद निवडणुक ; १८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी

जळगाव विधान परिषद निवडणुक ; १८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी

६३० सदस्य बजावणार मतदानाचा हक्क ; २५ मेपासून नामनिर्देशन प्रक्रिया

जळगाव प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ ची घोषणा होताच जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून १८ मेपासून संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.१८ जूनला मतदान तर २२ जूनला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हयातील ६३० मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. यंदाची निवडणूक पारंपरिक मतपत्रिकेद्वारे होणार असल्याने प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे.

२५ मेपासून नामनिर्देशन प्रक्रिया

निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २ जून ठेवण्यात आली असून ३ जून रोजी अर्जांची छाननी केली जाणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ६ जून असेल.१८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेदरम्यान स्वीकारण्यात येणार आहेत.

जिल्ह्यात ७ मतदान केंद्रांची व्यवस्था

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे. जळगाव, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, चोपडा आणि रावेर येथे मतदानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. संबंधित महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्यांना या केंद्रांवर मतदान करता येणार असून प्रत्येक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था, कर्मचारी आणि निवडणूक साहित्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

६३० सदस्य बजावणार मतदानाचा अधिकार

या निवडणुकीत जळगाव महानगरपालिका तसेच जिल्ह्यातील १५ नगर परिषद आणि ४ नगरपंचायतींतील निवडून आलेले व स्वीकृत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूण ६३० सदस्य या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होणार आहेत.या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रोहन घुगे तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अर्चना मोरे काम पाहणार आहेत.

जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक जम्बो बॅलेट बॉक्सची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी केंद्र आणि सुरक्षा कक्ष जिल्हास्तरावर प्रस्तावित करण्यात आले आहेत.

आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू झाली आहे. सार्वजनिक अथवा खासगी मालमत्तेवर परवानगीशिवाय पोस्टर्स, बॅनर, झेंडे लावणे किंवा घोषणाबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button