खान्देशजळगांवराजकीय

जळगावातील नादुरुस्त पथदिवे तातडीने सुरू करा; काँग्रेसचे महापौरांना निवेदन

जळगावातील नादुरुस्त पथदिवे तातडीने सुरू करा; काँग्रेसचे महापौरांना निवेदन

जळगाव : शहरातील पथदिव्यांची गंभीर समस्या सोडवून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी जळगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महापौर दीपमाला काळे यांना निवेदन देण्यात आले.

शहर काँग्रेसचे महानगराध्यक्ष जमील शेख यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी महापौरांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले. शहरातील ५० टक्क्यांहून अधिक पथदिवे बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी मार्ग अंधारात

अजिंठा चौफुली ते सुप्रीम कॉलनी या प्रमुख मार्गावरील पथदिवेही अनेक दिवसांपासून बंद असल्याने या परिसरात अपघात व अनुचित घटनांचा धोका वाढला आहे. त्यामुळे या मार्गावरील पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न

शहरातील विविध भागांमध्ये पथदिवे बंद असल्यामुळे नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने दुरुस्तीची कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन देताना महानगराध्यक्ष जमील शेख यांच्यासह अमजद पठाण, अनंत परिहार, विशाल पवार, ज्ञानेश्वर (भाऊ) कोळी, सलीम इनामदार, मनोज वाणी, विष्णू घोडसवार आणि चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

“जळगाव शहरातील अनेक भागांतील पथदिवे बंद असल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सर्व पथदिवे कार्यान्वित करावेत.”

जमील शेख, महानगराध्यक्ष, जळगाव शहर काँग्रेस कमिटी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button