
अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीजमध्ये भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
जळगाव : शहरातील गुरांच्या बाजाराजवळील सेक्टर एन-५ परिसरात असलेल्या अग्रवाल वेफर्स इंडस्ट्रीज कंपनीमध्ये मंगळवारी (दि. २३) सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. याबाबत श्री. जितेंद्र अग्रवाल यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीच्या परिसरात लागलेल्या आगीत तेल, पुठ्ठा, बॉयलर, पंखे तसेच रूममधील इतर साहित्य जळून नुकसान झाले. आग वेगाने पसरत असताना अग्निशमन दलाने तत्परतेने पाण्याचा मारा करून आग पूर्णपणे विझवली.
अग्निशमन दलाची धाडसी कामगिरी
घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठी जीवित व वित्तहानी टळली.
या कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान
आग विझविण्याच्या मोहिमेत अधिकारी भारत बारी यांच्यासह वाहन चालक देविदास सुरवाडे, संजय भोईटे आणि दीपक चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच फायरमन रोहिदास चौधरी, सुमित साळवे, नवाल शंकरपाळ, दीपक रोंदडे, जगदीश साळुंखे आणि संदीप कोळी यांनीही धाडसाने कार्य करत आग विझविण्यास हातभार लावला.
मोठा अनर्थ टळला
औद्योगिक परिसरात आग लागल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. मात्र अग्निशमन दलाच्या तात्काळ प्रतिसादामुळे आग वेळीच नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.





