
जळगावात ३ जुलैला ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक व प्रशिक्षण
रस्ता सुरक्षा उपाययोजनांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक; सेव्हलाईफ फाउंडेशनकडून क्षमता वृद्धी प्रशिक्षण
जळगाव : भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (MoRTH) वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘झिरो फॅटॅलिटी डिस्ट्रिक्ट’ (Zero Fatality District-ZFD) कार्यक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यात शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी आढावा बैठक आणि क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील अपघातप्रवण ठिकाणे, रस्ता सुरक्षा उपाययोजना, अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
त्यानंतर सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात सेव्हलाईफ फाउंडेशनच्या तज्ज्ञांकडून रस्ता सुरक्षेसंदर्भात क्षमता वृद्धी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रस्ता सुरक्षा, अपघात प्रतिबंध आणि आपत्कालीन प्रतिसाद याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या बैठकीस आणि प्रशिक्षण कार्यक्रमास संबंधित विभागांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य सचिव तथा अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी केले आहे.





