
अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी प्रकरणाच्या निषेधार्थ काँग्रेसचा ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह
१० जुलै रोजी जळगावात आंदोलन; पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ जळगाव शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार, १० जुलै रोजी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आंदोलन दुपारी २.३० वाजता महात्मा गांधी रोडवरील महात्मा गांधी उद्यानासमोरील चिमुकले श्रीराम मंदिर येथे होणार आहे. या सत्याग्रहात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच काँग्रेस विचारांशी निष्ठा असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा दुपट्टा परिधान करून उपस्थित राहावे. तसेच शक्य असल्यास पांढरी गांधी टोपी परिधान करावी, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
या आंदोलनाचे आवाहन जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पूर्व)चे जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी (पश्चिम)चे जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव आणि जळगाव शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष जमील शेख यांनी केले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगी प्रकरणातील कथित गैरव्यवहाराच्या निषेधार्थ १० जुलै रोजी जळगावात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




