खान्देशजळगांव

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला नागरिकांचा विश्वास-पालकमंत्री

‘मुद्देमाल सुपूर्दगी’तून जळगाव पोलिसांनी जिंकला नागरिकांचा विश्वास-पालकमंत्री

२.१६ कोटींचा चोरीचा मुद्देमाल मूळ मालकांच्या ताब्यात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

जळगाव | प्रतिनिधी

“चोरीस गेलेला मुद्देमाल शोधून तो मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही केवळ कायदेशीर प्रक्रिया नसून नागरिकांच्या कष्टाच्या कमाईचा सन्मान आहे. अशा उपक्रमांमुळे पोलीस दलावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होतो,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित ‘मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमे’ अंतर्गत चोरीस गेलेल्या वाहनांसह सोने-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम व इतर मौल्यवान वस्तू संबंधित मालकांना परत देण्याच्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

नागरिकांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच यश

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, चोरीला गेलेल्या वस्तू या केवळ मालमत्ता नसतात, तर त्या एखाद्या कुटुंबाच्या कष्टाच्या कमाईशी आणि भावनिक आठवणींशी जोडलेल्या असतात. त्यामुळे अशा वस्तू शोधून मूळ मालकांच्या ताब्यात देणे ही पोलीस दलाची महत्त्वाची जबाबदारी आहे. नागरिकांना त्यांचा हक्काचा मुद्देमाल परत मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या मोहिमेचे खरे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच जप्त मुद्देमालाची तातडीने सुपूर्दगी करण्यावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नागरिकांनीही सतर्क राहून अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता राखावी आणि संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

पोलीस दल अधिक आधुनिक आणि सक्षम

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पोलीस विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक असून आधुनिक तंत्रज्ञानामुळे तो अधिक सक्षम झाला आहे. शासन पोलीस दलाच्या पाठीशी ठामपणे उभे असून नागरिक आणि पोलीस यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक मजबूत करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशा सन्मानामुळे नवी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

पोलिसांबद्दल नागरिकांचा विश्वास वाढला

आमदार सुरेश भोळे यांनी आपल्या मनोगतात, मुद्देमाल सुपूर्दगी मोहिमेमुळे चोरीला गेलेला माल परत मिळू शकतो, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव केल्याने त्यांच्या मनोबलात निश्चितच वाढ होईल, असे सांगितले.

२.१६ कोटींचा मुद्देमाल परत

या कार्यक्रमात जळगाव परिमंडळ, चाळीसगाव परिमंडळ आणि जळगाव जिल्हा सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त प्रयत्नातून २ कोटी १६ लाख ८४ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यात चारचाकी वाहने, मोटारसायकली, मोबाईल फोन, रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने तसेच इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश होता.

उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी, विधी व न्याय विभागातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील तसेच गुन्हे तपासात मोलाचे सहकार्य करणाऱ्या नागरिकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन पोलीस हवालदार अमित माळी यांनी केले, तर आभार अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी मानले.

जिल्हा क्रीडा मैदानाचे लोकार्पण

याच कार्यक्रमानिमित्त जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील नूतनीकरण करण्यात आलेल्या क्रीडा मैदानाचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, माजी महापौर विष्णू भंगाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

नूतनीकरणामध्ये बहुउद्देशीय हॉलमध्ये सिंथेटिक टेराफ्लेक्स बॅडमिंटन कोर्ट, ४०० मीटर सिंथेटिक धावपट्टी, मैदानाच्या मध्यभागी हिरवळ, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ यंत्रणा तसेच संपूर्ण क्रीडा संकुलाचे सुशोभीकरण करण्यात आले असून आता हे मैदान खेळाडूंसाठी खुले करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button