खान्देशगुन्हेजळगांव

बोगस पत्रकारांकडून पैसे उकळण्याच्या तक्रारी; कारवाईची मागणी

बोगस पत्रकारांकडून पैसे उकळण्याच्या तक्रारी; कारवाईची मागणी

शासकीय कार्यालये, व्यापारी  यांना ओळखपत्राचा धाक 

जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरासह जिल्ह्यात काही व्यक्ती पत्रकार असल्याचे भासवून शासकीय अधिकारी, व्यापारी, उद्योजक तसेच विविध व्यावसायिकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. पत्रकारितेची अधिकृत ओळख किंवा संबंधित संस्थेचे अधिकृत प्राधिकरण नसतानाही ओळखपत्राचा वापर करून दबाव निर्माण केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

कार्यालयांमध्ये जाऊन दबाव निर्माण केल्याचा आरोप

काही कथित पत्रकार विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर पत्रकारितेचा दबाव आणत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानंतर एक हजार, पाच हजार किंवा दहा हजार रुपये अशा स्वरूपात रकमेची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात आहे. वैयक्तिकरित्या किंवा समूहाने संबंधित व्यक्तींशी संपर्क साधून पैसे मागितल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत.

व्यापारी व व्यावसायिकही लक्ष्य?

शहरातील काही पेट्रोल पंप, हॉटेल-ढाबे, वाईन शॉप तसेच इतर व्यावसायिकांकडूनही पत्रकार असल्याचे सांगून पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अलीकडे आकाशवाणी चौक परिसरातील एका पेट्रोल पंप चालकाकडून काही व्यक्तींनी हजारो रुपये घेतल्याची माहिती समोर आली असून, या प्रकाराची स्वतंत्रपणे चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

शासकीय विभागांमध्येही वावर

महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, वनविभाग यासह विविध शासकीय कार्यालयांमध्ये पत्रकार असल्याचे सांगून दबाव निर्माण केला जात असल्याच्या तक्रारी आहेत.

खऱ्या पत्रकारितेलाही बदनाम होण्याचा धोका

काही व्यक्तींच्या अशा कथित प्रकारांमुळे प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचीही प्रतिमा मलीन होत आहे. पत्रकारिता ही समाजातील गैरप्रकार उघड करण्याचे माध्यम असताना तिच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळविण्याचा प्रयत्न होत असल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे.

अशा व्यक्तींकडे वैध ओळखपत्र, नियुक्तीपत्र किंवा संबंधित माध्यम संस्थेचे अधिकृत प्राधिकरण आहे का, याची पडताळणी करून पैसे उकळण्याच्या तक्रारींची चौकशी करावी. दोष आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button