खान्देशजळगांव

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड; दोन भावांना बेड्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांची घरफोडी २४ तासांत उघड; दोन भावांना बेड्या

एमआयडीसी पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; २०८ ग्रॅम सोन्यासह चांदीचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव: शहर परिसरातील रामेश्वर कॉलनीत घडलेल्या ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांच्या मोठ्या घरफोडीचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २०८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २८ ग्रॅम चांदी असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७, दोघे रा. रामेश्वर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील संगीता घुगे या २७ ऑगस्ट रोजी कुटुंबासह उज्जैन येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. या काळात बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके व त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला.

तपासात रामेश्वर कॉलनीतच राहणाऱ्या दाभाडे बंधूंचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यावर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली. आरोपींकडून सोन्याचे गंठन, विविध प्रकारच्या पाटल्या, अंगठ्या, टॉप्स, नथ आणि चांदीचे जोडवे असा एकूण ३१ लाख २६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, प्रदीप चौधरी, रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश टेकर, किरण पाटील, शशिकांत मराठे, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगी घुगे व सुभाष साबळे यांच्या पथकाने फत्ते केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button