
‘ऑपरेशन ३/२५’ने शस्त्रधारकांचे धाबे दणाणले!
१० वर्षांतील शस्त्र गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या; पहाटेच २१४ ठिकाणी पोलिसांच्या धाडी, ७ कट्टे अन् १९ काडतुसे जप्त
जळगाव : आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी पहाटे ‘ऑपरेशन ३/२५’ ही धडक मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत गेल्या दहा वर्षांत शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असलेल्या संशयितांना लक्ष्य करण्यात आले. जिल्हाभरात तब्बल २१४ ठिकाणी एकाचवेळी झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत ७ गावठी कट्टे, १९ जिवंत काडतुसे, तलवार, चाकू, २५ मोबाईल आणि ३ मोटारसायकली, असा एकूण ७ लाख १९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहाटे सहा वाजता एकाचवेळी धडक
जळगाव पोलिसांनी मागील दहा वर्षांतील शस्त्र गुन्हेगारांचा डेटा संकलित करून संशयितांची विशेष यादी तयार केली होती. शस्त्रे स्वतःकडे न ठेवता नातेवाईक किंवा मित्रांकडे लपवून ठेवण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित ठिकाणीही कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी करण्यात आली.
गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्याने शस्त्र बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले.
भुसावळ-वरणगावात कट्टे जप्त
भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी किशोर ऊर्फ गोजऱ्या सकरू जाधव (वय ३१) याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वरणगाव पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक गावठी कट्टा व एक काडतूस असा ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
एमआयडीसी, एलसीबीचीही धडक कारवाई
एमआयडीसी पोलिसांनी रोशन विकास पाटील (वय २६) याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेने राजकिरण मानसिंग परदेशी (वय २६) आणि रईस रफिक तांबोळी (वय २१) यांच्याकडून दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतुसे असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
चाळीसगावात दोन कट्ट्यांसह काडतुसे
चाळीसगाव शहर पोलिसांनी प्रथमेश लक्ष्मण भामरे (वय २०) याच्याकडून दोन गावठी कट्टे, सहा जिवंत काडतुसे आणि एक चाकू असा ७२ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच मोहिमेत जयेश किरणसिंग राजपूत (वय २६) याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली.
याशिवाय दीपक सुभाष मरसाळे (वय ३०) याच्याकडून २५ मोबाईल आणि तीन मोटारसायकली असा तब्बल ४ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गंभीर गुन्ह्यांपूर्वीच मुसक्या आवळण्याचा प्रयत्न
‘ऑपरेशन ३/२५’च्या माध्यमातून शस्त्र बाळगणाऱ्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा पोलिसांनी जोर दिला आहे. आगामी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
“जिल्ह्यात कोणताही गंभीर अपराध घडण्यापूर्वीच त्याला आळा घालणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या अचानक आणि माहिती आधारित विशेष मोहिमा राबवून गुन्हेगारी प्रवृत्तींचा बीमोड केला जाईल.”
— श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, जळगाव
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही धडक मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे अंमलदार आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला.





