खान्देशगुन्हेजळगांव

ईद-ए-मिलादनिमित्त जळगाव पोलिसांची कडेकोट तयारी; ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण

ईद-ए-मिलादनिमित्त जळगाव पोलिसांची कडेकोट तयारी; ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया पूर्ण

शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाच्या सूचना; मिरवणुकीला परवानगी बंधनकारक, ड्रोनसह सोशल मीडिया मॉनिटरिंगवर भर

जळगाव | प्रतिनिधी : ईद-ए-मिलादसह आगामी ईद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व्यापक तयारी केली आहे. याच अनुषंगाने पोलीस मुख्यालयात शांतता समिती सदस्य आणि मिरवणूक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासनातील अधिकारी, शांतता समितीचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.

मिरवणुकीसाठी परवानगी बंधनकारक

मिरवणुकीसाठी प्रशासनाची अधिकृत परवानगी घेणे बंधनकारक राहणार असून, मंजूर करण्यात आलेल्या मार्गात कोणताही बदल करता येणार नाही. मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह गाणी, घोषणा किंवा कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

सोशल मीडियावरही आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ अथवा संदेश प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले. मिरवणुकीत इतर देशांचे झेंडे वापरण्यास बंदी असून, झेंडे फिरवून वाद निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. मिरवणुकीत शिस्त राखण्यासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचेही निर्देश देण्यात आले.

वाहतुकीसाठी विशेष नियोजन

मिरवणुकीच्या मार्गावर गर्दी वाढल्यास परिस्थितीनुसार वाहतूक वळविण्यात येणार आहे. नागरिकांना कमीतकमी त्रास होईल आणि मिरवणूक सुरळीत पार पडेल, यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षीच्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती टाळण्याचे आवाहन

मागील वर्षी ईदच्या अनुषंगाने जळगाव शहरात सात गुन्हे दाखल झाले होते. यंदा एकही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बैठकीत करण्यात आले. उत्सव शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.

वीज, रस्ते आणि पाण्याची व्यवस्था

मिरवणूक मार्गावरील पायाभूत सुविधांबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरणने ओपन डीपी बंद करणे, विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे आणि वायरिंगची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महापालिकेला मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे हटवून रस्ते स्वच्छ ठेवण्यासह खड्डे बुजविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त

ईदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, १० एसडीपीओ, २ प्रोबेशनरी डीवायएसपी, ३० पोलीस निरीक्षक, २०० एपीआय/पीएसआय, ३४०० पोलीस अंमलदार, ८ आरसीपी, १५ स्ट्राइकिंग फोर्स, १६०० होमगार्ड, १०० वाहतूक शाखेचे कर्मचारी आणि २०० एसआरपीएफ कमांडो यांचा समावेश आहे.

याशिवाय २ बीडीडीएस पथके, ४ डॉग युनिट, १५ कंट्रोल रूम मॉनिटरिंग कर्मचारी आणि १५ सोशल मीडिया/सायबर मॉनिटरिंग कर्मचारी तैनात राहणार आहेत.

५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया

ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईला वेग दिला असून, जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. संवेदनशील भागात रूट मार्च सुरू असून दंगल नियंत्रण योजनेची रिहर्सलही पूर्ण करण्यात आली आहे.

संबंधित गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून, सोशल मीडिया मॉनिटरिंग सातत्याने सुरू आहे. मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे.

डीजेवर पोलिसांची नजर

मिरवणुकीतील डीजेच्या वापराबाबत स्वतंत्र बैठका घेण्यात येत असून, संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि महापालिका प्रशासनाशीही आवश्यक समन्वय साधण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

ईदचा उत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करावा. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद अथवा आक्षेपार्ह बाबी निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपायुक्त निर्मला गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समिती सदस्य, मिरवणूक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button