खान्देशगुन्हेजळगांव

नवीन बसस्थानकात दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पकडले

नवीन बसस्थानकात दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पकडले

गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला; १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव : प्रतिनिधी : जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उषा चंदन ससाणे (वय ४८) आणि अनिता विजय ससाणे (वय ३५) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.

बसमध्ये चढताना दागिने लंपास

१८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नवीन बसस्थानकात जळगाव ते चाळीसगाव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका प्रवाशाच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि कानातील सोन्याचे टॉगल असा सुमारे ४५ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. याप्रकरणी २० जुलै रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांना तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथक तयार करण्यात आले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे दोन्ही महिलांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले.

तिघा गुन्ह्यांची उकल

पोलिसांच्या चौकशीत दोन्ही महिला देराणी-जेठाणी असल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २२६/२०२६, १७३/२०२६ आणि २१२/२०२६ मधील घटनांबाबत माहिती मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.

१ लाख ५ हजारांचे सोन्याचे दागिने हस्तगत

पंचांसमक्ष कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांनी महिलांकडून तीन घटनांमधील सोन्याचे दागिने हस्तगत केले. त्यामध्ये—

  • सुमारे ४५ हजार रुपये किमतीची ८ ते ९ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत आणि सुमारे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉगल.
  • सुमारे १५ हजार रुपये किमतीची ४ ते ५ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत.
  • सुमारे ४५ हजार रुपये किमतीची ७ ते ८ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत.

असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

आणखी घटनांचा तपास सुरू

ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही महिलांच्या पूर्वीच्या नोंदी तपासल्या असता अमळनेर पोलीस ठाण्यात तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात चोरीसंदर्भातील गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यांनी आणखी काही घटना केल्या आहेत का, याबाबत जिल्हापेठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button