

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करण्याचे आवाहन
सावद्यात शांतता समितीची बैठक; गुलालाऐवजी गुलाबपाकळ्यांची उधळण करण्याचे आवाहन
सावदा | मुख्तार शेख l आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सावदा पोलीस ठाण्याच्या वतीने सावदा येथील जेहरा मॅरेज हॉलमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत गणेशोत्सव काळात शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
बैठकीस जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील, सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश फड, महावितरणचे अधिकारी गणेश महाजन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बाविस्कर, पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
गुलालाऐवजी गुलाबपाकळ्यांची उधळण करा
बैठकीत मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी गणेश मंडळांना विविध महत्त्वाच्या सूचना दिल्या. श्री गणेशाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलालाची उधळण करण्याऐवजी गुलाबपाकळ्यांची उधळण करावी, असे आवाहन त्यांनी केले. गणेश मंडळांनी आपल्या मंडळाच्या ठिकाणी तसेच परिसरात देखरेखीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
मिरवणुकीदरम्यान वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांमुळे इतर धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची प्रत्येक मंडळाने दक्षता घ्यावी. गणेशोत्सवाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करून जनजागृती करावी, असे आवाहनही गावित यांनी केले.
कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई
सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश फड साहेब यांनी जेहरा मॅरेज हॉल मालक हाजी शब्बीर हुसैन अख्तर हुसैन,( बाबु सेठ) यांच्या मनापासून आभार व्यक्त करताना सांगितले की बाबु सेठ यांनी वेळोवेळी केव्हाही पोलीस प्रशासनाला मिटिंग साठी हॉल उपलब्ध करून दिले आहे याचं या कार्य मुळे आम्ही आभारी आहोत असे सांगितले
गणेशोत्सवासह सर्व सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. उत्सव साजरा करताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची सर्वांनी काळजी घ्यावी. कायदा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा रेणुका पाटील, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, असलम सर, महावितरणचे गणेश महाजन यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस तलाठी रशीद तडवी, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पत्रकार बांधव, विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, हिंदू-मुस्लिम समाजबांधव, शांतता समितीचे सदस्य, महिला दक्षता समितीच्या सदस्या, सर्व पोलीस पाटील तसेच मुस्लिम पंच कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावदा पोलिस ठाण्याचे एपी आय गणेश फड यांनी बैठकीचे सूत्रसंचालन पाटील सर यांनी केले, तर पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले.



