
एमआयडीसी पोलीस ठाण्यात वकिलाला धक्काबुक्की केल्याचा आरोप
पोलीस निरीक्षक बब्बन आव्हाड यांच्याविरोधात तक्रार; सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवून स्वतंत्र चौकशीची मागणी

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक बब्बन आव्हाड यांनी आपल्याशी धक्काबुक्की, शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप अॅड. सय्यद फराझ अन्वर अखलाक अली यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी पोलीस अधीक्षक, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आणि जळगाव जिल्हा वकील संघाकडे लेखी तक्रार देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. या तक्रारीला अनेक वकिलांनी पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.
तक्रारीनुसार, ३ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजता अॅड. सय्यद फराझ हे त्यांचे सहकारी अॅड. असद उल गौस अब्दुल कादिर यांच्यासह एका फौजदारी प्रकरणाच्या संदर्भात व्यावसायिक कर्तव्य पार पाडण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी आपण वकील असल्याचे सांगितल्यानंतरही अपमानास्पद वर्तन करून धक्काबुक्की केली आणि पोलीस ठाण्याबाहेर ढकलल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे.
वकिली कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप
पोलीस कर्मचाऱ्यांकडून शिवीगाळ, धमकावणे आणि कायदेशीर कामकाजात अडथळा आणल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. वकिलाच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या या प्रकाराची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी
घटनेच्या वेळी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये महत्त्वाचे पुरावे नोंदले गेले असण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित फुटेज तातडीने सुरक्षित ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मूळ रेकॉर्डिंग, बॅकअप, सिस्टम लॉग्स, स्टेशन डायरी, ड्युटी रोस्टर आणि अभ्यागत नोंदवही यांचेही जतन करावे, अशी विनंती तक्रारीत केली आहे.
चौकशी संबंधित अधिकाऱ्यांच्या अधीन नसलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत करावी. घटनेत सहभागी कर्मचाऱ्यांची ओळख निश्चित करून दोषी आढळणाऱ्यांवर विभागीय आणि कायदेशीर कारवाई करावी, तसेच आवश्यकतेनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने संदीप बी. पाटील, अॅड. श्रीरंग पाटील, अॅड. आरिफ अब्दुल्ला, अॅड. रहीम, अॅड. इम्रान हुसेन, अॅड. जुबेर खान, अॅड. फराझ अली, अॅड. हाशिम खाटीक, अॅड. मुख्तार पटेल, अॅड. रईस बागवान, अॅड. नोमान पठाण, अॅड. असद तवर, अॅड. शाकीर, अॅड. रिझवान, अॅड. विकार, अॅड. हुसेन खाटीक आणि जाकीर खाटीक आदी निवेदन देताना उपस्थित होते.
सार्वजनिक माफी आणि कार्यवाहीची मागणी
संबंधित पोलीस निरीक्षक आणि जबाबदार कर्मचाऱ्यांनी बिनशर्त सार्वजनिक माफी मागावी, वकिलांच्या व्यावसायिक अधिकारांच्या संरक्षणासाठी पोलिसांना स्पष्ट सूचना द्याव्यात आणि तक्रारदाराला भविष्यात धमकी किंवा त्रास दिला जाणार नाही, याची खात्री करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती बार कौन्सिल आणि जळगाव जिल्हा वकील संघालाही करण्यात आली आहे. तसेच तक्रारीवरील कार्यवाही, चौकशीचे निष्कर्ष आणि सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवल्याची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, हे आरोप तक्रारदाराने केलेले असून, त्यांची स्वतंत्र पडताळणी आणि चौकशी होणे आवश्यक आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बाजू किंवा प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया उपलब्ध झालेली नाही.




