
BHR ठेवीदारांच्या प्रश्नांवर सहकारमंत्र्यांचे लक्ष वेधले; आमदार सुरेश भोळे यांची मुंबईत भेट
ठेवी व्याजासह परत करण्याची मागणी; वसुलीचा तपशील जाहीर करून पारदर्शक पद्धतीने परतावा देण्याचे निवेदन

जळगाव : BHR मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) मुंबई येथे राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. यावेळी ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
BHR मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीमध्ये हजारो ठेवीदारांनी आपल्या कष्टाची कमाई जमा केली आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या ठेवी अडकून पडल्याने ठेवीदार आर्थिक संकटात सापडले आहेत. या ठेवी व्याजासह परत मिळाव्यात, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याशिवाय, अवसायकामार्फत करण्यात आलेल्या वसुलीचा आणि जमा झालेल्या निधीच्या वितरणाचा सविस्तर तपशील जाहीर करावा, ठेवीदारांना परतावा देण्याची प्रक्रिया पारदर्शकपणे राबवावी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, आजारी ठेवीदार तसेच मृत ठेवीदारांच्या वारसांना प्राधान्याने मदत करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. ठेवीदारांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी ठेवीदारांच्या आर्थिक अडचणी आणि त्यांच्या कुटुंबांवर ओढवलेल्या परिस्थितीची सहकारमंत्र्यांना माहिती दिली. या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित यंत्रणांमार्फत आवश्यक कार्यवाही करावी आणि ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
ठेवीदारांच्या कष्टाच्या पैशांची परतफेड होणे आणि त्यांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत ठेवीदारांना दिलासा द्यावा, अशी भूमिका आमदार भोळे यांनी यावेळी मांडली.



