जळगाव ;- खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या जीवनातील अनुभवांना अस्सल बोलीत शब्दरूप दिले. येथल्या मातीचा गंध त्यांनी शब्दांद्वारे काव्यातून आविष्कृत केला. त्यामुळेच त्या थोर कवियित्री झाल्या असे मत मायाताई धुप्पड यांनी व्यक्त केले. मू.जे.महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्ताने ‘निसर्गकन्या बहिणाबाई’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.विद्या पाटील उपस्थित होत्या. यावेळी मायाताई यांनी बहिणाबाईंच्या कवितेतले भावसौंदर्य, निसर्ग, नादमयता, तत्वज्ञान आणि त्यांची सामाजिक भूमिका विशद करतांना विविध कवितांची उदाहरणे देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी हितगुज साधतांना अनेक कविता लयबद्ध गाऊन ओघवत्या शैलीत कवितेच्या अर्थाचे विश्लेषण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल पाटील यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.योगेश महाले, डॉ.विलास धनवे, प्रा.गोपीचंद धनगर, प्रा.रेणुका झांबरे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.