
‘त्या ‘मजुरांना चिरडणाऱ्या घटनेची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून उकल
मुरूम वाहून नेणाऱ्या डंपर चालकाला अटक
जळगाव प्रतिनिधी ;-
जळगाव खुर्द गावाजवळ ११ रोजी पहाटेच्या सुमारास महामार्गालगत सुरू असलेल्या सव्हींस रस्त्याच्या बांधकामस्थळी झालेल्या अपघातामध्ये तीन मजुरांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना उघडकीस आली होती . घटनेनंतर पोलिसांनी कसून तपास केला असता संशयित चालक प्रकाशकुमार सुदामाप्रसाद पटेल (वय २४, रा. उफरवली, जि. सिंधी, मध्यप्रदेश) याला अटक केली.अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.
जळगाव खुर्दजवळील उड्डाणपुलाशेजारी सव्हींस रस्त्याचे काम सुरू आहे. येथे परप्रांतीय मजूर काम करत होते. सोमवारी रात्री उशिरा नाल्याच्या बांधकामानंतर काही मजूर तिथेच झोपले. पहाटेच्या सुमारास मुरुम वाहतूक करणाऱ्या एका डंपरने त्यांना चिरडले. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावर न थांबता पसार झाला.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मुरुम वाहतूक करणाऱ्या तिघा डंपर चालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला आरोपींनी काहीही माहिती नसल्याचा दावा केला. मात्र, कसून चौकशीत प्रकाशकुमार पटेल याने डंपर रिव्हर्स घेत असताना झोपलेल्या मजुरांना चिरडल्याची कबुली दिली. आरोपी चालकाला रात्री उशिरा अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.