इतर

डॉ. भोजराज रुग्णांचे आधारवड – गिरीश महाजन ; सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापणार – पालकमंत्र्यांची घोषणा

“जीएमसी” मध्ये अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे उदघाटन

आरोग्य विभागातील विविध संवर्गांना दिले मणकारोगविषयी प्रशिक्षण

जळगाव l ०२ सप्टेंबर २०२३ l डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वरी कार्य आहे. त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो. मुंबईचे मणकारोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे रुग्णांसाठी आधारवड असून त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा फायदा जळगावच्या रुग्णांसाठी आपण उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण आरोग्यक्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कलियुगातील परमेश्वर म्हणजे डॉक्टर असून आता जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे शनिवार दिनांक २ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले. त्यानंतर ते बोलत होते.

सकाळी चार स्वयंचलित शस्त्रक्रिया खोल्या असलेल्या सुसज्ज, अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे देशातील सुप्रसिद्ध मणकारोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर ओपीडीतील कक्ष क्र. ११४ बी येथे मणकारोग तपासणी कक्षाचे उदघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यानंतर जिल्हा नियोजन भवन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन, निरामय सेवा फाउंडेशन, आणि जीएम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य क्षेत्रातील विविध वर्गांचे मणक्याचे आजार याविषयी प्रशिक्षण घेण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि. प. सीईओ अंकित, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. शेखर भोजराज, डॉ. अर्चना भोजराज, अधिष्ठाता गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरुवातीला देवी धन्वंतरीची प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. प्रस्तावनेत अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी, कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट करून रुग्णालयाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मंत्रीद्वयींचें आभार मानले. यानंतर डॉ. भोजराज यांनी, प्रशिक्षणाची गरज सांगितली. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र दिला होता. त्यानुसार ग्रामीण भागात आरोग्यसेवा करणाऱ्या आशा सेविका ह्या आरोग्य विभागाचा महत्वाचा कणा असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. डॉक्टर परमेश्वर समान असून त्यांच्या कौशल्याची उपलब्धता जिल्हावासीयांसाठी करून दिली जात आहे. डीपीडीसी माध्यमातून गेल्या ५ वर्षात सामान्य रुग्णालयासाठी निधी उपलब्ध केला आहे.

माता व बालसंगोपनसाठी ३५ कोटी तर मोहाडी रुग्णालयाला ७५ कोटी मंजूर केले आहे. योग्य वेळी दूध न मिळाल्याने नवजात बालकांचे मृत्यू होतात. अशा बालकांना वेळेवर दूध मिळावे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात डीपीडीसी माध्यमातून मदर मिल्क बँक स्थापन करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी करीत, आरोग्य विभागासाठी निधी कमी पडू देणार नाही असे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या आरोग्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे काम आशा, अंगणवाडी सेविका करीत असून त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावले असल्याची माहिती अध्यक्षीय भाषणात ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

डॉ. शेखर भोजराज यांच्या स्पाईन फाउंडेशनचे कार्य देशभरात सुरु असून कौतुकास्पद आहे. जळगावात त्यांची सेवा मिळाली, हे आपले भाग्य आहे. आता सरकारी रुग्णालयात मोफत उपचार सेवा सुरु झाली असून त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे असे सांगून गिरीश महाजन यांनी. सामान्य रुग्णालयासाठी दर्जेदार काम व भरघोस निधी “डीपीडीसी”माध्यमातून दिल्याबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी केले. आभार डॉ. जोतीकुमार बागुल यांनी मानले. कार्यक्रमासाठी आरोग्यदूत रामेश्वर नाईक, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, डॉ. किशोर इंगोले, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ योगिता बावस्कर, डॉ. विलास मालकर, दिलीप मोराणकर, संजय चौधरी, डॉ. सुनयना कुमठेकर, जनसंपर्क सहायक विश्वजीत चौधरी, प्रकाश पाटील, अजय जाधव यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button