मेहरुण तलावात बुडालेल्या तरुणाचा अखेर दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

मेहरुण तलावात बुडालेल्या तरुणाचा अखेर दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला
जळगाव (प्रतिनिधी): मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी तांबापूरा येथील २३ वर्षीय नदीम शेख याचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने शनिवारी, ७ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजता बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवूनही त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. अखेर रविवारी, ८ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा मृतदेह तलावात तरंगताना आढळला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनिवारी, ७ जून रोजी बकरी ईदच्या सुट्टीमुळे नदीम शेख हा त्याचे मेहुणे अझहर खान, मामेभाऊ इरफान शेख, तोहीत खान आणि मित्र मोहसीन खान यांच्यासह मेहरुण तलाव परिसरात गेला होता. उकाड्यामुळे सर्वजण तलावात आंघोळीसाठी उतरले. सुरुवातीला नदीम काठावर थांबला होता, परंतु नंतर तो पाण्यात उतरला. पोहताना तो खोल पाण्यात गेला आणि गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत नदीम पाण्यात बुडाला.
घटनेची माहिती तातडीने एमआयडीसी पोलीस, अग्निशमन विभाग आणि महापालिका यंत्रणेला देण्यात आली. मात्र, नातेवाईकांनी प्रशासनाची मदत उशिरा पोहोचल्याचा आरोप केला. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम सुरू होती, परंतु नदीमचा थांगपत्ता लागला नाही. रविवारी सकाळी ७ वाजता तलावात त्याचा मृतदेह तरंगताना आढळला. महापालिका कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठवला.
मृतदेह आढळल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. परिसरात हळहळ व्यक्त झाली. घटनास्थळी आमदार सुरेश भोळे, तहसीलदार शीतल राजपूत यांच्यासह संबंधित अधिकारी दाखल झाले.
या घटनेसंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.