
जळगाव ;- ठाणे, नांदेड व घाटी येथे झालेल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यू तांडवाची पुनरावृत्ती जळगाव शासकीय रुग्णालयात होऊ नये म्हणून उपचारापेक्षा खबरदारी चांगली हा उपक्रम अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी राबवावा अन्यथा जळगाव येथे अशी अशा प्रकारची पुनरावृत्ती झाल्यास संपूर्ण यंत्रणेविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी मागणी जळगाव शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्य करणाऱ्या शिष्टमंडळाने शासकीय महाविद्यालयाचे व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आरोग्य मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन, पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांना सुद्धा देण्यात आलेले आहे.
निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र सरकार व शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांची, डॉक्टरांची दिरंगाई, दुर्लक्ष आणि बेदरकारपणा यामुळे महाराष्ट्राच्या जनते च्या जीवाशी खेळ सुरू आहे व हा प्रकार जळगावात घडणार नाही ना अशी भीती वाटू लागली आहे.
महाराष्ट्रातले तीन प्रमुख पक्षाचे तीन कॅबिनेट मंत्री जळगाव जिल्ह्यातील असल्याने जळगावला जीव रक्षक औषध साठा, डॉक्टरांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनुष्यबळ अथवा रक्त साठा अभावी कोणाचा मृत्यू होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
सदोष मनुष्य वधाचा गुन्हा
दिरंगाई, दुर्लक्ष, बेदाबदारपणा यामुळे जनतेचा जीव गेल्यास नाईलाजास्तव संपूर्ण यंत्रणेच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.
शिष्टमंडळात यांचा होता समावेश
समता परिषदेच्या निवेदिता ताठे, मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख, एमआयएमचे अध्यक्ष अहमद सर ,कुलजमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, हूसेनी सेना चे अध्यक्ष फिरोज शेख, एम पी जे चे अध्यक्ष आरिफ देशमुख, बी वाय एफ चे अध्यक्ष शीबान फा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा उपाध्यक्ष डॉक्टर शाकीर, इद गाह ट्रस्टचे सहसचिव अनिस शहा, इमदाद फाउंडेशनचे मतीन पटेल, नुरी फाऊंडेशन चे नाजीम शेख,सिकलगर बिरादरीचे मुजाहिद खान, मरकज फाउंडेशनचे रफिक शेख, उस्मानिया चे समाजसेवक समीर शेख आदींची उपस्थिती होती.