
महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर
जळगाव | प्रतिनिधी
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या तयार करण्याचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू झाली असून, ६ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे, तर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या सूचनेनुसार, १ जुलै २०२५ पर्यंत मतदार म्हणून नोंदणी केलेल्या व्यक्तींची नावे या यादीत ग्राह्य धरली जाणार आहेत. यानुसार, १४ ऑक्टोबरपासून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून मतदान याद्या डाउनलोड करता येतील.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेला कार्यक्रम
६ नोव्हेंबर: महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे व हरकती-सूचना मागविणे.
१४ नोव्हेंबर: प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत.
२८ नोव्हेंबर: दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करणे.
४ डिसेंबर: मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करणे.
१० डिसेंबर: मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रकाशित करणे.
या संदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी जारी केले आहेत. आयोगाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे वेळेत तपासून घ्यावे आणि आवश्यक त्या सुधारणा किंवा नोंदणीसाठी अर्ज सादर करावा.
महानगरपालिका निवडणुकीच्या हालचालींना वेग येत असून प्रशासन व राजकीय पक्षांमध्ये यामुळे हालचाली सुरू झाल्या आहेत





