भुसावळ :- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात वाणिज्य विभागाकडून प्रवासी वाहतून, फुकटे प्रवासी, माल वाहतूक, पार्सल वाहतूक पार्किंग जाहिरात आणि खानपान सेवा यातून फक्त सप्टेबर महिन्यात 134 कोटी तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 48 हजार फुकट्या प्रवाशांवर कारवाई करीत तीन कोटी 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणार्या रेल्वे गाड्यांसह विविध क्षेत्रातून उत्पन्न वाढीसाठी वाणिज्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहे. तिकीट तपासणी सोबतच माल वाहतूकीवर सुध्दा लक्ष केंद्रीत केले जाते आहे. यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ होत आहे. भुसावळ मंडळाच्या वाणिज्य विभागाचा सप्टेंबर 2023 चा महसूल 134.3 कोटी रूपयांचा मिळाला आहे. यात प्रवासी वाहतुकीतून 66.8 कोटी रूपये, माल वाहतुकीतून मिळालेला महसूल 34 कोटी 17 लाख रूपये, पार्सल वाहतुकीतून 12 कोटी 43 लाख, गाडीतून विनातिकीट प्रवास करणार्या 48 हजार फुकट्या प्रवाशांकडून तिकीट तपासणी करणार्यांनी तब्बल 3 कोटी 50 लाखाचा दंड वसूूल केला. पार्किंगमधून 36 लाख 28 हजार रूपये तसेच जाहीराती व अन्य कामातून 16 लाक 27 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. खानपान विभागाकडून 42 लाक 39 हजार रुपये, भुसावळच्या वाणिज्य विभागातर्फे अन्य कारवाईतून (फुटकर) 1 कोटी 24 लाख रूपयांची दंडाची रक्कम वसूल केली.
मनमाड स्टेशन येथे दिव्यांगासाठीचे टॉयलेटचे कार्य पूर्ण, सावदा रेल्वे स्टेशन येथून केळीचा बीसीएन रॅक आदर्श नगरात रवाना, जम्बो बीसीएन रॅक टाइम टेबल गुड्स ट्रेनमध्ये भुसावळ विभाग येथून ते आदर्श नगर पर्यंत 38 तास 28 मिनिटात पोहोचला तसेच बीसीएन 21 वॅगनमध्ये चना भरून चन्याचा रॅक खंडवा येथून बदलीपर्यंत रवाना झाला.