अभिनेत्री रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ चर्चेत
मुंबई ;- ‘अॅनिमल’ या चित्रपटानंतर अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या चर्चा थांबत नाहीत. रणबीर कपूरच्या गीतांजलीची भूमिका साकारून रश्मिकाने सर्वांची मने जिंकली आहेत. पण काही दिवसांपूर्वी रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडिओ चर्चेत आला होता.
यावरून सोशल मीडियावर बराच गदारोळ झाला होता. हे प्रकरण इतके वाढले होते की पोलिसांनाही यात सहभागी व्हावे लागले. पोलीस रश्मिकाच्या व्हायरल व्हिडिओची सतत चौकशी करत आहेत.
दरम्यान, रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओबाबत एक अपडेट समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांची ओळख पटवली आहे. मात्र, पोलिसांचा तपास अद्याप सुरूच आहे. पोलीस मुख्य आरोपीच्या शोधात आहेत.
पोलिसांनी म्हटले आहे की, त्यांनी अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या बनावट प्रोफाइलच्या प्रकरणात गुंतलेल्या चार संशयितांना शोधून काढले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक मेकर नसून अपलोडर आहेत. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा पोलिस अजूनही शोध घेत आहेत.
रश्मिकाचा डीप फेक व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही अंदाज लावू शकत नाही की, ती अभिनेत्री नसून दुसरी मुलगी आहे. या व्हिडिओने चाहत्यांना हादरवले होते. रश्मिकाच्या आधी अनेक अभिनेत्री या डीपफेक व्हिडिओच्या बळी ठरल्या आहेत. या यादीत आलिया भट्ट, काजोल आणि कतरिना कैफ यांचीही नावे आहेत.