खान्देश टाइम्स न्यूज | ३१ जानेवारी २०२४ | जळगावचे पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची सोलापूर शहर पोलिस आयुक्तीपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एमसीव्ही महेश्वर रेड्डी बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी बुधवारी सायंकाळी भारतीय व राज्य राज्य पोलीस सेवेतील अनेक अधिकार्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या कार्यकाळात आजवरच्या पोलीस दलातील सर्वाधिक एमपीडीए कारवाया करण्यात आल्या. 20 ऑक्टोबर 2022 रोजी जळगाव पोलिस दलात एम.राजकुमार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात सर्वाधिक मोक्कासह हद्दपारीच्या कारवाया करण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध अधिकारी म्हणून एम.राजकुमार यांनी काम पाहिले. पोलिस दलातील कसूर करणार्या अधिकार्यांसह कर्मचार्यांवरही त्यांनी कुठल्याही दबावाविना कठोर कारवाई करीत आपल्या कार्याचा ठसा उमटवला. सर्वांना सांभाळून घेणाऱ्या आणि अत्यंत शिस्तबद्ध असलेल्या अधिकार्याच्या बदलीनंतर पोलिस कर्मचार्यांना मोठा धक्का बसला आहे.
नाशिक परीक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे
नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांच्या जागी जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक व ठाणे शहर सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांची बदली करण्यात आली आहे. दत्तात्रय कराळे यांना देखील जिल्ह्याचा चांगला अभ्यास असून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे.
चाळीसगाव अपर अधीक्षकपदी कविता नेरकर
चाळीसगावचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांची पुणे ग्रामीण अपर पोलिस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य मुंबई सायबर सेलच्या कविता नेरकर बदलून येत आहेत.