खान्देश टाइम्स न्यूज | ७ फेब्रुवारी २०२४ | जळगाव शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागातील गलथान कारभाराची मालिका खान्देश टाइम्स न्यूजने प्रसिद्ध केली आहे. नेहमी आर्थिक देवाण घेवाणचे आरोप होत असलेल्या नगररचना विभागात ‘सेठ’चा हस्तक्षेप काही कमी होत नाही. ‘सेठ’ची हिम्मत वाढतच चालली असून इमारती तोडफोड, जमीनदोस्त करण्याची परवानगी देण्यासाठी चक्क ७५ ग्रॅम ते ५ किलोपर्यंत पनीर जिलेबी घेतली जात असल्याची चर्चा आहे.
जळगाव शहर मनपातील नगररचना विभाग कायम चर्चेत असला तरी त्यावर कोणाचाही अंकुश नसल्याचे सर्वश्रुत आहे. नगररचना विभागातील कारभाराबाबत कुणीतरी कधीतरी ओरडतो आणि काही दिवसात पुन्हा चुप्पी साधतो. एकही बडा नेता किंवा लोकप्रतिनिधी त्याविरुद्ध अद्याप सतत पाठपुरावा करीत नसल्याने मोठे आश्चर्य आहे. जळगावात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या नियमबाह्य आणि अनधिकृत बांधकामाची संबंधित फायली इकडून तिकडे फिरविण्याचे आणि आर्थिक देवाण घेवाणचे काम सेठच्या माध्यमातून होत असल्याचे बोलले जात आहे.
मनपात केवळ सेठच नाही तर काही इतर व्यक्ती देखील शासकीय फाईल इकडून तिकडे घेऊन जाताना दिसतात. नगररचना विभागातील कामे बाहेरच्या बाहेर पूर्ण करून देण्यासाठी सध्या २-३ पंटरमध्ये चढाओढ सुरू असून त्यातूनच खरी स्पर्धा वाढत आहेत. खाजगी पंटरच्या माध्यमातून कामे जलद गतीने आणि कोणत्याही नियमशीर चौकशी पार न पडता मार्गी लागत असल्याने पंटर लोकांची चलती आहे. वाढत्या स्पर्धेतून पंटर एकमेकांवर शिंतोडे उडवू लागले असून त्यात मनपाची बदनामी होऊ लागली आहे.
इमारत बांधकाम आणि पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी सेठ आणि काही लोक पुढाकार घेत असल्याचे तर सर्वश्रुतच होते मात्र चक्क इमारत जमीनदोस्त करण्याची परवानगी देखील सेठमार्फत दिली जात असल्याची चर्चा आहे. मनपा नगररचना विभागातील लॉग बुकच स्वतःच्या कार्यालयात ठेवून परवानगी दिली जात असल्याची देखील माहिती आता समोर येत आहे. एका इमारतीसाठी ७५ ग्रॅम ते ५ किलोपर्यंत पनीर जिलेबी घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. नगररचना कार्यालयात नाश्ता पोहाचविण्यापासून अधिकाऱ्यांना आपले वाहन वापरण्यास देण्यापर्यंत सेवा सुविधा सेठ पुरवू लागले आहे.
मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी याविषयी नुकतेच एका वृत्तपत्राला प्रतिक्रिया देखील दिली असून कोणत्याही चुकीच्या प्रकाराला थारा देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, अद्यापही कुणाचीही चौकशी झालेली नसून कुणालाही लगाम घालण्यात आलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. छ. शिवाजी नगरातील १२० फ्लॅट, पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील एक रुग्णालय, डी मार्ट परिसरातील ब्यूटिपार्लर, आदर्श नगरातील १० मजली इमारत तसेच भास्कर मार्केट परिसरातील एक क्लिनिक आदी प्रकरणात ‘सेठ’ने आयुक्तांच्या नावाने सेटलमेंट केल्याची चर्चा असल्याचे वृत्त नुकतेच एका दैनिकाने प्रसिद्ध केले होते. नगररचना विभागाची चर्चा सर्वदूर असली तरी अद्याप काहीही हालचाल होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे.