जळगाव;- शेतात बैलगाडी घेऊन जात असतांना बैलगाडी बांधावर चढल्याने ती पालटून झालेल्या अपघातात १३ वर्षीय मुलाच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील वाकडी येथे आज ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
गौरव आनंदा पाटील (वय १३, रा. मु. वाकडी, पो. म्हसावद, ता. जळगाव) असे मयत मुलाचे नाव असून तो गावात आई, वडील, काका, १ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. त्याचा परिवार शेतीकाम करून उदरनिर्वाह करतो. गौरव पाटील हा थेपडे शाळेत ७ वी इयत्तेत शिकत होता. सोमवारी दि. ११ मार्च रोजी तो शेतात बैलगाडी घेऊन गेला होता. धावता धावता अचानक बांधावर चढून बैलगाडी पलटी झाली. या बैलगाडीखाली गौरव दबला जाऊन त्याच्या डोक्याला जबर मार लागला. आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्याला उचलून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी आणले.
रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.