पारोळाः- येथील दिल्ली दरवाजा भागातील रहिवासी असलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनीने राहत्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटे साडेसात वाजता उघडकीस आली.
याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नम्रता भास्कर फासगे (वय १६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. पहाटे साडेसात वाजेच्या सुमारास नम्रता ही आपल्या घरातच अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. नातेवाइकांनी त्या ठिकाणी धाव घेतली.
तिला खाली उतरवून येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याबाबत अलका निरमुळे यांनी दिलेल्या माहितीवरून येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजीव जाधव करत आहेत.