
ड्रग्स पेडलरशी संबंध महागात; एलसीबीचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे निलंबित
जळगाव | प्रतिनिधी स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना ड्रग्स पेडलरशी कथित संबंध आल्याच्या पार्श्वभूमीवर निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हा निलंबनाचा आदेश दिला असून, प्रकरणाची सखोल चौकशी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.
जळगाव एमआयडीसी परिसरात अलीकडेच ड्रग्स पेडलर अबरार कुरेशी विरोधात कारवाई करण्यात आली होती. तपासाच्या दरम्यान एलसीबीमधील काही अधिकाऱ्यांचे संबंध या ड्रग्स पेडलरशी असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. विशेष म्हणजे उपनिरीक्षक पोटे यांचा या संशयिताशी संबंध असल्याच्या हालचाली प्रशासनाच्या निदर्शनास आल्या होत्या.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या चौकशीत, पोटे यांच्याकडे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीशी प्रत्यक्ष संबंधाचे ठोस पुरावे सापडले नसले तरी, पोलीस खात्यात असताना कोणत्या व्यक्तीच्या संपर्कात राहावे, याचे भान न ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
या आधीही एलसीबीमधील दोन कर्मचाऱ्यांचा एका गुटखा विक्रेत्यासोबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकरणांनी पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का बसत असून, यापुढील कारवायांमध्ये आणखी काही जण तपासाच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
निलंबनाच्या कालावधीत उपनिरीक्षक पोटे यांच्यावरील चौकशी भुसावळ डीवायएसपीमार्फत पूर्ण केली जाणार आहे. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.