
स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी – पालकमंत्री गुलाबराव पाटील
‘कंपोस्ट खड्डा भरा, गाव स्वच्छ ठेवा’ मोहिमेचा शिरसोलीत उत्साहात शुभारंभ
जळगाव (प्रतिनिधी) : “स्वच्छता ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून ती केवळ सरकारची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा २ अंतर्गत ‘एक खड्डा… एक संकल्प – स्वच्छ गाव, समृद्ध गाव!’ या संकल्पनेतून ‘कंपोस्ट खड्डा भरा, आपलं गाव स्वच्छ ठेवा’ या जिल्हास्तरीय मोहिमेचा शुभारंभ शिरसोली येथे झाला. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते नाडेफ खड्डा आणि कचरा विलगीकरण केंद्राचे लोकार्पण करण्यात आले.
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य
शिरसोली प्र.न. मराठी शाळेत आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “घरटी शौचालय बांधणीचा टप्पा यशस्वी झाला असून, आता ओला व सुका कचरा विलगीकरण, त्याचा योग्य वापर व कंपोस्ट खड्ड्याद्वारे जैविक खतनिर्मितीवर भर द्यावा लागेल. हे खत शेतीसाठी वरदान ठरेल.”
आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्याचा गौरव
पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या स्वच्छता जनजागृती मोहिमेचे कौतुक करत, “त्यांच्या कार्यामुळे स्वच्छता ही जनआंदोलनाच्या रूपात समोर आली आहे. स्वयंसेवी संस्थांचे योगदानही स्तुत्य आहे,” असे सांगितले.
जैविक खत निर्मितीचे फायदे – मीनल करनवाल
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “कंपोस्ट खड्ड्यांद्वारे तयार होणारे जैविक खत पर्यावरणपूरक असून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. स्वच्छतेची शपथ ही फक्त कागदावर न राहता कृतीत उतरली पाहिजे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर सोनवणे यांनी केले तर आभार गटविकास अधिकारी सतीश धस यांनी मानले.
कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख व माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी सभापती नंदूआबा पाटील, सरपंच हिलाल भील, उपसरपंच द्वारकाबाई बोबडे, माजी सरपंच अनिल पाटील, दुध संघ संचालक रमेशअप्पा पाटील, ग्रामपंचायत सदस्य गौतम खरे, मुदस्सर पिंजारी, श्याम कोगटा, युवासेनेचे रोहित कोगटा, विस्तार अधिकारी राजेश इंगळे, ग्रामसेवक चिंचोरे, संवादतज्ञ निलेश रायपूरकर, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास, समूह समन्वयक शिरीष तायडे यांच्यासह ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.