भुसावळ येथे दवाखान्यात आठ जणांच्या हल्ल्यामध्ये दोन जण गंभीर जखमी

भुसावळ येथे दवाखान्यात आठ जणांच्या हल्ल्यामध्ये दोन जण गंभीर जखमी
भुसावळ : शहरातील अकबर टॉकीज परिसरात शुक्रवारी (७ जून) सायंकाळी साडेसात सुमारास डॉ. फिरोज खान यांच्या दवाखान्यात दोन सहकाऱ्यांवर आठ जणांच्या टोळीने हल्ला केला. मोहम्मद अली आणि आवेश खान अशी मारहाण झालेल्या डॉक्टरांच्या सहकाऱ्यांची नावे असून, दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. रुग्णालयात विनाकारण बसण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले. आरोपींनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी दोघांवर बेदम मारहाण केली. या प्रकरणी डॉ. फिरोज खान (रा. खडका
रोड, भुसावळ) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीतील माहितीनुसार, आरोपी अजीम खान, रजीम खान, कैफ खान, सैफ खान, साहिल खान, सोहेल खान, मजेत खान आणि शफिक खान (सर्व रा. अकबर टॉकीज परिसर, भुसावळ) यांनी रागाच्या भरात हल्ला केला. मारहाणी दरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद अली आणि आवेश खान यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.