जानवेच्या तरुणाला अवैध दारू वाहतूक प्रकरणी अटक; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

जानवेच्या तरुणाला अवैध दारू वाहतूक प्रकरणी अटक; ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त
अमळनेर : अवैधरीत्या दारूची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असलेल्या जानवे येथील तरुणाला डीवायएसपी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई दि. ५ रोजी सायंकाळी साडे चार वाजता अमळनेर-धुळे रोडवरील एचपी गॅस गोडाऊनजवळ करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, जानवे गावातील निलेश अशोक पाटील (वय २५) हा मोटरसायकल (क्र. एमएच १९ सीएच ६३६५) वरून दारूची अवैध वाहतूक करत असल्याची माहिती डीवायएसपी विनायक कोते यांना मिळाली. त्यांनी पोलीस नाईक प्रमोद बागडे, हितेश बेहरे, गणेश पाटील व शेखर साळुंखे यांना कारवाईसाठी पाठवले.
पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचून निलेश पाटीलला अडवले असता, त्याच्या मोटरसायकलवरील चार झोल्यांमध्ये देशी व विदेशी कंपनीच्या दारूच्या बाटल्या आढळल्या. निलेशकडे दारू बाळगण्याचा किंवा विक्रीचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले असून तो ही दारू विक्रीसाठी जानवे येथे नेत होता.
पोलिसांनी दारूच्या बाटल्या व मोटरसायकल असा एकूण ४३ हजार २५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी हितेश बेहरे यांच्या फिर्यादीवरून निलेश पाटील याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५(अ) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.