खान्देश टाइम्स न्यूज l १५ मे २०२४ | जळगाव शहरातील इंद्रनील सोसायटी परिसरात राहणारे कुटुंबीय गावाला जात होते. रेल्वेने जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक येथे आले असता तिकीट खिडकी वर तिकीट घेतांना दागिने आणि मौल्यवान ऐवज असलेली बॅग बाहेरच राहिली. काही वेळातच प्रकार लक्षात आला मात्र तोवर बॅग जागेवर नव्हती. रेल्वे पोलिसात तक्रार नोंदविल्यावर याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भावरी यांनी तात्काळ जळगांव पोलिसांच्या (सी.सी.टी. व्ही विभाग) नेत्रम कक्षाच्या माध्यमातून शहरातील फुटेज तपासले असता एक वयस्क महिला बॅग घेऊन जातांना दिसली पुढील फुटेज पाहिले असता सदर महिला 3 रिक्षा बदलून मोहाडी गावात उतरली असल्याचे रिक्षाचालक यांनी सांगितले असे नेत्रम चे कर्मचारी मुबारक देशमुख यांनी निरीक्षक भवारी यांना कळविले त्या आधारे अवघ्या 3 तासात मोहाडी गावातून बॅग शोधून काढली.
जळगाव इंद्रनील सोसायटी परिसरात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या वर्षा गणेश बडगुजर या मंगळवार दि.१४ रोजी परिवारासह बुरहानपूर येथे जाण्यास निघाल्या होत्या. दुपारी जळगाव रेल्वे स्थानकावर आले असता लिफ्टमध्ये चढत असताना त्यांनी बॅग बाहेर ठेवली होती. मुलगा फोनवर बोलत होता तेवढ्यात नजर चुकली आणि बॅग गहाळ झाली. बॅगेत सोन्याचा हार, चांदीचे दागिने असा लाखाचा ऐवज असल्याने सर्वच चिंतेत पडले. आजूबाजूला शोध घेऊन देखील बॅग न मिळाल्याने त्यांनी रेल्वे पोलिसात तक्रार नोंदवली.
शहर पोलिसांनी नेत्रमच्या मदतीने लावला छडा
रेल्वे पोलिसांनी आणि संबंधित कुटुंबाने जळगाव शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, कर्मचारी रतन गिते यांनी लागलीच रेल्वे स्टेशन गाठले. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्यावर एक वयस्कर महिला बॅग घेऊन जाताना कैद झाली. पोलिसांनी जिल्हा पोलीस दलाच्या नेत्रम कक्षाला भेट दिली. पोलीस कर्मचारी मुबारक देशमुख यांच्या मदतीने संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे पाहिले असता रेल्वे स्थानकाहून वृद्धा रिक्षाने बसली आणि टॉवर चौकात उतरली. पुन्हा तेथून रिक्षाने प्रवास करीत महिला मोहाडी गावात उतरली. शहर पोलिसांनी रिक्षाचा शोध महिलेची ओळख पटवली.
पोलीस अधिक्षकांच्या हस्ते परत केले दागिने :
शहर पोलिसांनी मोहाडी गावात जाऊन चौकशी केल्यावर वृद्ध महिलेचे घर गाठले आणि बॅग ताब्यात घेतली. बॅगेतील सर्व ऐवज सुरक्षीत असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी बॅग पोलीस ठाण्यात आणली. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते बॅग आणि दागिने बडगुजर कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. शहर पोलीस आणि नेत्रम कक्षाच्या माध्यमातून अवघ्या काही तासात बडगुजर कुटुंबाला आपला ऐवज परत मिळाल्याने त्यांना आनंद झाला होता. पोलिसांचे त्यांनी आभार मानले.