जळीत वॉर्डात पालकमंत्री यांची भेट ; इतर जिल्ह्यातील रुग्णही आहेत भरती
खान्देश टाइम्स न्यूज l २६ सप्टेंबर २०२४ l जळगाव l आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सिव्हिल हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय येथे मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. स्मिताताई वाघ होत्या.
सुसज्ज असे जळीत कक्ष व अतिदक्षता विभाग :
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते व आणि खा. स्मिता वाघ यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा 20 खाटांच्या जळीत कक्षात ( बर्न वार्ड) 5 खाटांचे आयसीयू, 5 विशेष जळीत खाटा आणि उर्वरित 10 जनरल जळीत खाटांचा समावेश असून येथील सर्व खाटा जळालेल्या रुग्णांसाठी राखीव आहेत. या अत्याधुनिक वार्डामध्ये वातानुकूलित (ए.सी.) सोयीसह रुग्णांना अधिक आरामदायी उपचार मिळत असून याशिवाय स्क्रीन ग्राफ्टिंगसारख्या जटिल शस्त्रक्रिया आणि हायड्रोशन सारख्या आधुनिक उपचार पद्धती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच सदर कक्षामध्ये एक सुसज्ज असे लहान शस्त्रक्रिया गृह देखील उपलब्ध आहे ज्यामुळे जळालेल्या रुग्णांच्या उपचाराची गुणवत्ता अधिक वाढेल. जंतुसंसर्ग कमी होणे, मृत्यूचे प्रमाण कमी होणे व रुग्ण बरा झाल्या व नंतरचे व्यंग/ विद्रूपपणा हे सर्व कमी होण्यास मदत होईल. डीपीडीसीच्या माध्यमातून एकूण 03 कोटी 60 लाख रुपये खर्च करण्यात आलेला आहे.
यांची होती उपस्थिती :
याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, जिल्हा नियोजन समिती सदस्य राधेश्याम अग्रवाल, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, सिव्हील सर्जन डॉ किरण पाटील, उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. अक्षय सरोदे डॉ., डॉ. सुरेखा चव्हाण डॉ. राजेश जांभुळकर वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड, योगिता बावस्कर , विश्वनाथ पुजारी दीपक शेजवळ, राजेश जांभूळकर, डॉ. चंद्रमोहन हरणे तसेच अधिसेविका प्रणीता गायकवाड, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व त्या विभागातील डॉक्टर्स मेट्रन मॅडम व इतर नर्सिंग स्टाफ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी DPDC मार्फत देण्यात आलेल्या मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागासाठी यंत्रसामुग्री बाबत सविस्तर माहिती विषद करून यामुळे रुग्णांना होणारे फायदे याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन उप अधिष्ठाता डॉ. मारुती पोटे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक, डॉ. विजय गायकवाड यांनी मानले.