लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर
सामाजिक, राजकीय, सहकार, शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव
संगमनेर l १८ जुलै २०२३ l प्रतिनिधी l सततच्या विकास कामांमधून संगमनेर तालुका विकासाचे मॉडेल बनवत राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळताना या विभागांना लोकाभिमुख बनवणारे निळवंडे धरणाचे शिल्पकार , जलनायक काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना यावर्षीच्या स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
मनमाड येथे कॉम्रेड माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने 2023 चा राजकीय सामाजिक सहकार व शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दलचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार लोकनेते बाळासाहेब थोरात यांना जाहीर करण्यात आला यावेळी अध्यक्ष ॲड .साधना गायकवाड ,सचिव कॉम्रेड राजू देसले, विश्वस्त भास्कर शिंदे, दामू पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते. 51 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, शाल ,गौरव पत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे .
खंडकरी शेतकऱ्यांसाठी लढणारे कॉम्रेड माधवराव गायकवाड यांनी स्वातंत्र्य लढ्यातही महत्त्वाचे योगदान दिले .स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून काम केले .याचबरोबर हाउसिंग सोसायटी उभ्या करताना नांदगाव विधानसभेचे आमदार, विधान परिषदेचे आमदार, विरोधी पक्ष नेते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ,किसान सभेचे अध्यक्ष असे विविध पदे त्यांनी भूषवली. याचबरोबर आयटक, नगरपालिका कर्मचारी संघटना, रेल्वे युनियन या संघटनांचेही नेतृत्व केले.
त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार आमदार थोरात यांना जाहीर झाला आहे.
आमदार बाळासाहेब थोरात हे 1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे सलग आठ वेळा विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करत आहे. राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, रोहयो, राजशिष्टाचार, खार जमीन, जलसंधारण, पाटबंधारे अशी विविध पदे त्यांनी सांभाळली असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पदही यशस्वीपणे सांभाळले आहे. काँग्रेसच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे ते सदस्य असून सध्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला त्यांनी पाणी दिले आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सहकार क्षेत्रात आमदार बाळासाहेब थोरात यांचे मोठे काम असून यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतो आहे. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य असून सर्व राजकीय पक्षांसह विविध क्षेत्रात त्यांचा मोठा आदर केला जात आहे .
यापूर्वीही त्यांना अनेक पुरस्कार मिळाले असून यावर्षी 2023 चा स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड माधवराव गायकवाड हा पुरस्कार त्यांना आज जाहीर झाला असून शानदार कार्यक्रमात आमदार थोरात यांना गौरवण्यात येणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे