जळगाव दि.७ (प्रतिनीधी) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ३३ वा दीक्षांत समारंभ उद्या बुधवार दि. ८ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आला असून या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री. सी. पी. राधाकृष्णन राहणार आहेत. यावेळी विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली चे अध्यक्ष प्रा.एम. जगदीश कुमार यांचे दीक्षांत भाषण होईल.
एकूण २२ हजार ५१५ विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करण्यासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे -१०५५६ स्नातक, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ४१२८ स्नातक, मानवविज्ञान विद्याशाखेचे ५२७३ आणि आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे २५५७ स्नातकांचा समावेश आहे. या शिवाय स्वायत्त असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ३६६, मुळजी जेठा महाविद्यालयाचे १३२८ , प्रताप महाविद्यालयाचे ७५९, जी.एच.रायसोनी इन्स्टीट्युट ऑफ बिझीनेस मॅनेजमेंटचे ७९३, व आर. सी. पटेल इन्स्टिटयुट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च, शिरपूरचे १४८ अशा एकूण ३३९४ विद्यार्थ्यांना पदवी बहाल केली जाणार आहे. गुणवत्ता यादीतील ११९ विद्यार्थ्यांना या समारंभात सुवर्णपदक दिले जाणार आहे. या मध्ये ८७ विद्यार्थिनी व ३२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या समारंभात १६४ पीएच.डी. धारक विद्यार्थी देखील पदवी घेणार आहेत. या समारंभासाठी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे सव्वातास उपस्थित राहणार आहेत. या कालावधीत प्रा. एम. जगदीश कुमार यांचे दीक्षांत भाषण, कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांचे अहवाल वाचन आणि राज्यपालांचे अध्यक्षीय भाषण होईल. राज्यपालांच्या हस्ते १० विद्यार्थ्यांना सुवर्णपदके दिली जाणार आहेत. या दहा विद्यार्थ्यांची नावे ड्रॉ पध्दतीने काढण्यात आली आहेत. त्यानंतर राज्यपाल तथा कुलपती या दीक्षांत समारंभाचा समारोप करतील व ते कार्यक्रमातून प्रस्थान करतील. मात्र उर्वरीत १०८ विद्यार्थ्यांना त्यानंतर कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी व प्रा. एम. जगदीशकुमार यांच्या उपस्थितीत सुवर्णपदके दिली जाणार आहेत.
मुलींच्या वसतिगृहाचे उदघाटन
विद्यापीठास रुसा अंतर्गत प्राप्त निधीतून बांधकाम केलेल्या २११ विद्यार्थिनींची क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृह क्रमांक ४ चे उदघाटन याच दिवशी सकाळी राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. या वसतिगृहासाठी आठ कोटी एकतीस लाख रुपये खर्च झाला असून रुसा अंतर्गत पाच कोटी सत्तर लाख रुपये निधी प्राप्त झाला तर उर्वरित रक्कम विद्यापीठाच्या सर्वसाधारण निधीतून खर्च करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांसाठी सुचना
विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर स्नातकांसाठी डिग्री कोड देण्यात आला आहे. याशिवाय मोबाईल मॅसेजद्वारे देखील डिग्री कोड पाठविण्यात आला आहे. स्नातकांनी पदवी ग्रहण करण्यासाठी सभारंभाच्या दिवशी प्राप्त झालेली डिग्री कोड, ओळखदर्शक कागदपत्रांसह सकाळी ७.३० वाजता उपस्थित रहावे. स्नातकांना पदवी प्रमाणपत्र मिळणे सोयीचे व्हावे, याकरीता पदवी प्रमाणपत्राचे व उत्तरीय वाटप अभ्यासक्रमनिहाय खालील प्रमाणे प्रशासकीय इमारतीत काऊंटरवर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दालन क्र. ६०३ (परीक्षा भवन तळमजला) खिडकी क्र. ०१ पीएच्.डी. आणि एम. फील. सर्व विषय, दालन क्र. १०७ (सामान्य प्रशासन, आवक-जावक विभाग):- खिडकी क्र.०२ वर बी.ए. व एम.ए. इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत व उर्दू, दालन क्रमांक १०७ सामान्य प्रशासन (आवक–जावक विभाग) बी.ए. आणि एम.ए. (ह्युमॅनीटीज) इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संरक्षणशास्त्र, तत्वज्ञान, म्युझीक, मास कम्युनिकेशन, स्त्री अभ्यास, बी.एस.डब्लू., एम.एस.डब्लू., डी.पी.ए., बी.फ.ए., एम.,एफ.ए., दालन क्रमांक ११४ (प्रवेश व पात्रता विभाग) बी. एस्सी. – सर्व विषय, दालन क्रमाक ११४ (प्रवेश व पात्रता विभाग) एम.एस्सी.-सर्व विषय, दालन क्रमांक १११ (ई-सुविधा केंद्र) (प्रवेश व पात्रता विभागाशेजारील) बी.कॉम., एम.कॉम., आणि सर्व मॅनेजमेंट कोर्सेस, दालन क्रमांक ११४ (प्रवेश पात्रता विभाग) बी.ई.- सर्व विषय, बी.टेक. – सर्व विषय, एम. टेक.-सर्व विषय, बी.व्होक. – सर्व सर्व विषय, दालन क्रमाक ६०३ (परीक्षा भवन तळमजला) लॉ, मेडीकल आणि फार्मसी, दालन क्रमांक १११ (ई सुविधा केंद्र) (प्रवेश व पात्रता विभागा शेजारील कक्ष) बी.एड.आणि एम.एड. एम.ए.-एज्युकेशन.
समारंभात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट, पांढऱ्या रंगाची पँन्ट किंवा पांढऱ्या रंगाचा नेहरु शर्ट आणि पांढऱ्या रंगाचे चुस्त तर विद्यार्थिंनीसाठी लाल किनार असलेली पांढरी साडी, लाल रंगाचे ब्लाऊज किंवा लाल रंगाचा कुर्ता (कमीज) व पांढऱ्या रंगाची सलवार अशा पोशाखात उपस्थित रहावे.
तसेच सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (live) विद्यापीठाच्या संकेतस्थळावर होणार आहे. सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनाही बघता यावे यासाठी महाविद्यालयांनी व्यवस्था करावयाची आहे. या बाबत सर्व महाविद्यालयांना सूचना निर्गमीत केलेल्या आहेत.
दीक्षांत समारंभ संपल्यानंतर सायंकाळी ४ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जे विद्यार्थी या समारंभास उपस्थित राहणार नाहीत अशा गैरहजर विद्यार्थ्यांना ९ जानेवारी ते ३१ जानेवारी पर्यंत विद्यापीठाच्या पदवी प्रदान विभागातून कार्यालयीन वेळेत ओळखदर्शक पुरावा दाखवून पदवी प्रमाणपत्र घेता येईल. जे विद्यार्थी एक महिन्यापर्यंत विद्यापीठात येऊन त्यांचे प्रमाणपत्र घेऊन जाणार नाहीत त्यांचे प्रमाणपत्र फेब्रुवारी,२०२५ पासून टपालाव्दारे (स्पीड पोस्ट) टप्प्या-टप्प्याने पाठविण्यात येणार आहे.