अपघात

अपघात : ‘महाबासुंदी चहावाला’ तरुण ठार, दोघे गंभीर जखमी

खान्देश टाइम्स न्यूज l जळगाव l २९ जून २०२५ l रावेरकडून भुसावळकडे येणाऱ्या रस्त्यावर बामणोद ते पाडळसा मार्गावर रविवारी (२९ जून २०२५) संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाजवळ ‘गुळाची महाबासुंदी चहा’ विक्री करणारा तरुण मयूर अण्णा गवळी (रा. जळगाव) हा त्याचे मित्र जयेश पाटील आणि गोयर यांच्यासोबत दुचाकीवरून बामणोद येथे गेला होता. काम आटोपून तिघे जण दुचाकीने घरी परतत असताना, रस्त्यावरील एका वळणावर त्यांची दुचाकी भरधाव वेगात असलेल्या एसटी बसला धडकली.

अपघाताची तीव्रता इतकी होती की, मयूर गवळी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जयेश पाटील आणि गोयर हे दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तात्काळ भुसावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर जळगावातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मयूर गवळीच्या अकाली निधनाने जळगावमधील समाजमन सुन्न झाले आहे. मयूर हा त्याच्या ‘महाबासुंदी चहा’च्या दुकानामुळे परिचित होता. मनमिळाऊ स्वभाव, हसतमुख चेहरा आणि इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती यामुळे त्याचा जनसंपर्क मोठा होता आणि त्याचा मित्रपरिवारही दांडगा होता. त्याच्या अपघाताची बातमी कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. मयूरच्या पश्चात त्याची आई, पत्नी, एक मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button