खान्देशगुन्हेजळगांव

जिल्ह्यातील वाळूमाफियांविरोधात पोलिसांचा दणका

जिल्ह्यातील वाळूमाफियांविरोधात पोलिसांचा दणका

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर एका दिवसात पाच ठिकाणी धडक कारवाई

जळगाव l प्रतिनिधी l गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आता वाळूमाफियांविरोधात कठोर भूमिका घेत मोठी मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाया करत पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांना गिरणा नदी पात्र लागून असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन केले जात असल्याची माहिती समोर येत होती. उत्खनन केलेली वाळू जिल्ह्यासह परजिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली जात असल्याचेही उघड झाले आहे. विशेष म्हणजे, वाळू वाहतूक करणारी वाहने महामार्गासह ग्रामीण रस्त्यांवरून भरधाव वेगाने धावत असल्याने अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आता थेट कारवाईची मोहीम सुरू केली आहे.

पहिल्याच दिवशी पाच गुन्हे दाखल

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली २८ मे रोजी जिल्ह्यात विविध ठिकाणी एकूण पाच कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली असून संबंधित चालक आणि मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रामदेववाडी येथे डंपर जप्त

जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेववाडी परिसरात पोलिसांनी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त केला. संबंधित वाहनाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगावात ट्रॅक्टरवर कारवाई

धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सतखेडा फाट्याजवळ दीड ब्रास वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करत वाहन जप्त केले.

एरंडोलमध्ये मालकासह चालकावर गुन्हा

एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडके ते खर्ची रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आले. या प्रकरणात वाहन चालकासह मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपळगाव हरेश्वर येथे डंपर जप्त

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोजे गावाजवळ पोलिसांनी एका डंपरवर कारवाई करत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कानळदा येथेही धडक कारवाई

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कानळदा गावालगत एका ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी एक ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला.

या सलग कारवायांमुळे जिल्ह्यातील वाळूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून आगामी काळात अशाच प्रकारच्या कारवाया आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस विभागाकडून देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button