जळगाव : उघड्यावर अनधिकृतपणे मांस विक्री करणाऱ्या १२४ जणांना मनपाने नोटिसा बजावल्या असून शहरातील मांस विक्री करणाऱ्यांना परवाने देणे व असलेले परवाने नूतनीकरणाचे काम सुरु आहे. शहरातील ७७ जणांनीच मांस विक्रीचा परवाना घेतल्याची नोंद महापालिकेत आहे, मात्र प्रत्यक्षात शहरात दोनशे पेक्षा जास्त जण मांस विक्री करीत आहे.आठवडाभरात सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
उघड्यावरील अनधिकृत मांस विक्रेत्यांवर कारवाईची मोहीम मोकाट कुत्र्यांचा वाढता त्रास पाहता महापालिकेने राबवली होती. आरोग्य विभागाने सर्वे करून सुमारे १२४ विक्रेत्यांना नोटीसाही बजावल्या होत्या. गेल्या सहा दिवसांपासून शहराच्या विविध भागात उघड्यावरील अनधिकृत मांस विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. यात विक्रेत्याचे पिंजरे, सुरे, लाकडी पाट, आदी साहित्य जप्त करण्यात येत आहेत
उघडयावर अनधिकृत किरकोळ मांस विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्वरीत बंद करावे, अन्यथा महानगरपालिकेडून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा सहायक आयुक्त उदय पाटील यांनी दिला आहे.