
तापी नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर सर्वात मोठी कारवाई
शेतकऱ्यांना डिझेल नाही, वाळू माफियांकडे मात्र १२ बॅरलचा साठा; १० पोकलेन, १० डंपर आणि ६ बोटी जप्त
जळगाव : अमळनेर तालुक्यातील सावखेडा परिसरातील तापी नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर प्रशासनाने अखेर मोठी कारवाई केली आहे. धावडा शिवारातून बोटींच्या सहाय्याने आणि १२ ते १४ चाकी डंपरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वाळू उपशावर धाड टाकण्यात आली. या कारवाईत तब्बल १० पोकलेन मशीन, १० डंपर आणि ६ बोटी जप्त करण्यात आल्या असून घटनास्थळावरून १० ते १२ बॅरल डिझेलही जप्त करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात शेतकऱ्यांना शेतीकामासाठी कॅनमध्ये डिझेल मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात डिझेलचा साठा आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे तालुक्यात इंधनाच्या काळ्या बाजाराची साखळी सक्रिय असल्याची चर्चा रंगली आहे.
सावखेडा येथे अधिकृत वाळू उत्खननाला मंजुरी असली तरी धावडा शिवारातून बेकायदेशीररीत्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाने छापा टाकत ही मोठी कारवाई केली.
या कारवाईनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत संबंधित वाहनांचे आरटीओ परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच पेट्रोलियम कायद्यांतर्गतही संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “अमळनेर तालुक्यातील धावडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध साहित्य जप्त करण्यात आले असून जिल्ह्यातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. अवैध वाळू वाहतुकीत वापरलेल्या वाहनांचे परवाने रद्द करण्यासह पेट्रोलियम कायद्याअंतर्गतही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.”





