इतर

अटक टाळण्यासाठी ३० हजारांची मागितली लाच; भुसावळातील PSI एसीबीच्या जाळ्यात

अटक टाळण्यासाठी ३० हजारांची मागितली लाच; भुसावळातील PSI एसीबीच्या जाळ्यात

तडजोडीनंतर २० हजारांवर सौदा; पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात थेट पोलीस अधिकाऱ्याचे नाव समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणात राजु सांगळे, नेमणूक बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ, तसेच सलिम हाकीम कुरेशी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई स्मिता नवघरे यांच्या पथकाने केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्यांच्या मित्राचा मार्च महिन्यात भुसावळ येथील खडका चौफुली परिसरात एका व्यक्तीसोबत पैशांच्या व्यवहारातून किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तीने तक्रारदारांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी ३० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी करताना आरोपी सलिम कुरेशी याने पोलीस उपनिरीक्षक राजु सांगळे यांच्या नावाने ३० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुढे तडजोडीनंतर ही रक्कम २० हजारांवर निश्चित करण्यात आल्याचे तपासात समोर आले. तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात अटक न करता केवळ चॅप्टर केस करून सोडण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी लाच स्वीकारण्यास संमती दर्शवून लाच रक्कम मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास केला.

या संपूर्ण कारवाईचे पर्यवेक्षण हेमंत नागरे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भ्रष्टाचारासंदर्भात माहिती असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button