नवापुरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; जळगाव मनपा ‘अलर्ट’ मोडवर, चिकन मार्केटच्या सर्वेक्षणाचे आदेश

नवापुरात ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव; जळगाव मनपा ‘अलर्ट’ मोडवर, चिकन मार्केटच्या सर्वेक्षणाचे आदेश
जळगाव: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात पोल्ट्री फार्म उद्योगात ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जळगाव महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. शहरात या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आरोग्य विभागाची तातडीची आढावा बैठक घेऊन शहरातील पोल्ट्री आणि चिकन मार्केटचे विशेष सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड न करता प्रतिबंधात्मक उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
या आढावा बैठकीत शहरात बर्ड फ्लूचा शिरकाव होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. उपमहापौरांनी दिलेल्या निर्देशानुसार, आता शहरातील सर्व चिकन दुकाने, पोल्ट्री फार्म आणि मांस विक्री केंद्रांची कसून तपासणी केली जाणार आहे. एखाद्या ठिकाणी आजारी किंवा मृत कोंबड्या आढळल्यास त्याची त्वरित नोंद घेऊन संशयित नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातील. विशेषतः नवापूर किंवा इतर बाधित भागातून शहरात येणाऱ्या पोल्ट्री वाहनांवर कडक लक्ष ठेवले जाणार असून, गरज भासल्यास शहराच्या प्रवेशद्वारांवर तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे.
स्वच्छतेच्या दृष्टीनेही प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. चिकन मार्केट, कत्तलखाने आणि पोल्ट्री परिसरात नियमित फवारणी व सॅनिटायझेशन करण्याचे आदेश देण्यात आले असून, अस्वच्छता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. संशयित परिस्थिती हाताळण्यासाठी विशेष टीम नियुक्त करण्यात येणार असून, नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
”शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नये, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. सर्व विभागांनी समन्वय राखून दररोजचा अहवाल सादर करावा,” असे निर्देश उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिले आहेत. दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता पूर्ण शिजवलेले अन्न सेवन करावे आणि सार्वजनिक ठिकाणी मृत पक्षी आढळल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





