
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी; मुख्यमंत्री कार्यालयाला मेल पाठविला
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही धमकी मुख्यमंत्री कार्यालयाला अज्ञात व्यक्तीकडून पाठवलेल्या ई-मेलद्वारे दिली गेली आहे, अशी माहिती उघड झाली आहे.
मेलच्या मजकुरात “जिल्हाधिकारी यांना ठार मारू” असा स्पष्ट उल्लेख करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे तक्रार दाखल केली असून, पोलीस प्रशासनाने याला गांभीर्याने घेत तपास सुरू केला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी देखील या धमकीची पुष्टी दिली असून, मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेण्यात येत आहे.