गोळीबार प्रकरणी आरोपीविरुद्ध मकोका किंवा एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल करा
एकता संघटनेचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

गोळीबार प्रकरणी आरोपीविरुद्ध मकोका किंवा एमपीडीए अंतर्गत गुन्हा दाखल करा
एकता संघटनेचे जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन
जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात वाढत्या अवैध दारू विक्री, जुगार व्यवसाय आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या सत्रावर अंकुश ठेवण्याची मागणी करत जिल्हा एकता संघटनेने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना तातडीचे निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे संघटनेने अलीकडील गोळीबारात सहभागी आरोपी तसेच त्याच्या गुन्हेगारी टोळीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
संघटनेच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू व्यवसाय व जुगार अड्डे उघडपणे सुरू असून, या पार्श्वभूमीवर राहुल रमेश बऱ्हाटे व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हे दाखल असूनही त्यांच्याविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनात तीन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत —
आरोपी राहुल बऱ्हाटे याच्यावर पूर्वी एमपीडीए अंतर्गत कारवाई झाल्यानंतरही आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात न आल्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांचे तत्काळ बदली करावी.
आरोपीविरुद्ध मकोका किंवा एमपीडीए अंतर्गत गुन्हा नोंदवून तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.
अवैध दारू व जुगार रॅकेटवर राज्य उत्पादन शुल्क विभाग व स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) माध्यमातून विशेष धाड टाकून परवाने रद्द करावेत.
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा एकता संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुक शेख यांनी दिला आहे. या निवेदनावर फारुक शेख यांच्यासह नदीम मलिक, अँड. आवेश शेख, अनिस शाह, हाफिज रहीम पटेल, आरिफ देशमुख, हाजी युसुफ शेख, सईद शेख, रज्जाक पटेल, सुलतान मिर्झा, अकील मणियार, रियाजुद्दीन शेख, मौलाना कासिम नदवी, अबूजर मिर्झा, इद्रीस खान, विकार खान, वकार शेख, जकी पटेल, राहिल अहमद, अरबाज खान व कारी शफिक अहमद यांसह अनेकांनी सह्या केल्या आहेत.
सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अल्पसंख्याक व मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, अँटी करप्शन ब्युरोचे सहाय्यक पोलीस संचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आल्या आहेत.





