
धरणगाव तालुका बनतोय लाचखोरीचा अड्डा?
दोन दिवसांत तीन अधिकाऱ्यांना रंगेहात अटक! ग्रामविकास अधिकारी २५ हजारांसह गजाआड
धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव तालुका लाचखोरीचा अड्डा बनतोय का? दोन दिवसांत तीन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. २१ मार्च रोजी दोन कंत्राटी कार्यक्रम अधिकाऱ्यांना दीड हजारांची लाच घेताना अटक झाली होती. त्यानंतर २२ मार्च रोजी पुन्हा ग्रामविकास अधिकाऱ्याला २५ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले.
२५ हजारांसाठी सुरू होता ‘दे-घे’चा खेळ!
धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन भीमराव ब्राम्हणे (वय ३७, रा. खर्दे बुद्रुक) यांनी गावातील गटारी आणि इतर बांधकामाच्या बिल मंजुरीसाठी १० टक्के लाच मागितली.
तक्रारदाराने २ लाख ७० हजार रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्यासाठी ग्रामसेवक ब्राम्हणे यांनी १,९५,००० आणि ६९,००० असे दोन धनादेश मंजूर करून २ लाख ६४ हजार रुपये तक्रारदाराच्या खात्यात वर्ग केले.
पण बिल मंजुरीच्या बदल्यात ब्राम्हणे यांनी २७ हजारांची लाच मागितली! तडजोडीनंतर रक्कम २५ हजारांवर ठरली आणि ती तातडीने आणण्याचा तगादा सुरू झाला.
रंगेहात पकडले! न्यायालयात हजर करून एक दिवसाची कोठडी
तक्रारदाराने तत्काळ जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. २२ मार्च रोजी लाचेच्या व्यवहाराची पडताळणी करून ACB पथकाने आरोपीला पैसे घेताच पकडले.
या धडक कारवाईत पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोलीस नाईक किशोर महाजन आणि पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
ग्रामविकास अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सततच्या लाचखोरीमुळे धरणगाव तालुका प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यात लाचखोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी ACBचा ससा-शर्यत सुरूच!
लाचखोरी रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे. लाचखोरीच्या प्रकरणांवर ACBचा धडक मारा सुरूच असल्याने भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.