इतर

देशभक्तीच्या रंगात न्हालं जिल्हा कारागृह !

देशभक्तीच्या रंगात न्हालं जिल्हा कारागृह !

“जीवन गाणे गातच जावे” संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात

जळगाव : समाजविघातक प्रवृत्तीमुळे कारागृहात गेलेल्या बंदींचा भावनिक विकास होऊन सकारात्मक विचारसरणी रुजावी, तसेच त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, या उद्देशाने जळगाव जिल्हा कारागृहात “जीवन गाणे गातच जावे” या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभाग, मुंबई यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

जिल्हा कारागृहाच्या कला भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील होते. जिल्हा कारागृह अधीक्षक गजानन पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी वरिष्ठ तुरुंग अधिकारी डी. जे. चव्हाण, तुरुंग अधिकारी राकेश देवरे, सुभेदार सुभाष खरे, श्री. खांडरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात स्वर शुभम ग्रुपच्या कलाकार कपिल घुगे आणि सहकारी यांनी “इतनी शक्ति हमें देना दाता” या स्फूर्तीदायक गीताने केली. त्यानंतर देशभक्तिपर गीतांनी संपूर्ण वातावरण भारावून गेले. कारागृहातील बंदी बांधवांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे उत्स्फूर्त स्वागत केले. विशेष म्हणजे, कारागृहातील दोन बंदी बांधवांनीही भक्तिगीत आणि देशभक्तिपर गीते सादर करून कार्यक्रमात सहभाग घेतला.

जळगावचे सुप्रसिद्ध लोकशाहीर विनोद ढगे आणि त्यांच्या “दिशा काला पथक” संस्थेच्या वतीने पारंपरिक लोककलेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आणि सकारात्मक जीवनदृष्टी यावर आधारित भारुड सादर करण्यात आले. या प्रभावी सादरीकरणाने बंदी बांधवांना अंतर्मुख होण्यास प्रवृत्त केले.

कार्यक्रमात स्वर शुभम ग्रुप व दिशा काला पथकाच्या १५ कलाकारांनी उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाची सांगता स्वर शुभम ग्रुपच्या कलावंत वर्षा पाटील यांनी “है मालिक, तेरे बंदे हम” या गीताने केली.

कार्यक्रमाचे समन्वयक विनोद ढगे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिशा संस्थेचे सचिन महाजन, मोहित पाटील, अवधूत दलाल, संतोष चौधरी, विनोद पाटील, आकाश भावसार, मनोज जैन यांनी मेहनत घेतली.

राज्यभर सुरू असलेल्या या उपक्रमाचे आयोजन मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या संकल्पनेतून, तसेच सचिव विकास खारगे व संचालक विभीषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button