
गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह दोन आरोपी जेरबंद
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शनिपेठ पोलीस ठाणे हद्दीत अवैध गावठी कट्टा व जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणल्याच्या माहितीवरून पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. संबंधित आरोपींविरोधात भारतीय हत्यार कायदा व महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.45 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गुप्त माहिती मिळाली की, राकेश दिलीप भावसार (वय 41, रा. सदाशिवनगर, जळगाव) हा ज्ञानदेवनगर ते काशिनाथनगर रोडावर गावठी पिस्तूल घेऊन थांबला आहे. या माहितीवरून पोउपनिरीक्षक योगेश ढिकले आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. तपासणीदरम्यान आरोपीच्या कमरेला बांधलेले गावठी कट्टा व चार जिवंत काडतुसे आढळून आले.
पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी दुपारी 1 ते 2 वाजेच्या दरम्यान प्रसाद संजय महाजन (वय 28, रा. ज्ञानदेवनगर, जळगाव) याच्याकडून 54,000 रुपये रोख रक्कम देऊन हे शस्त्र खरेदी केल्याचे कबूल केले. त्यावरून पोलिसांनी महाजन यालाही अटक केली.
या दोघांनी संगनमत करून अवैध शस्त्राची खरेदी-विक्री केल्याचे निष्पन्न झाल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात गुभारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनिरीक्षक योगेश ढिकले, पोहेकॉ युवराज कोळी, रविंद्र बोदवडे, शशिकांत पाटील, अनिल कांबळे व पराग दुसाने यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.