
जळगाव;- जळगाव शहर आणि जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत दुचाकी व इतर वाहने आढळून आली आहेत. या वाहनांच्या मालकांचा शोध घेऊनही ते मिळून आलेले नाहीत. त्यामुळे या वाहनांमुळे पोलीस स्टेशनच्या आवारात जागा अपुरी पडत आहे.
या संदर्भात, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. ज्यांच्या मालकीची वाहने बेवारस स्थितीत विविध पोलीस स्टेशनच्या आवारात आहेत, त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत (म्हणजे १६ मे २०२५ पर्यंत) आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा.
जर दिलेल्या मुदतीत कोणीही या वाहनांवर मालकी हक्क सांगितला नाही, तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ नुसार त्यांची जाहीर लिलाव प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जाईल, अशी ही जाहीर सूचना आज दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित पोलीस स्टेशन किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा.