
जळगावमध्ये चोरट्यांचा धडाका : मद्य दुकान फोडून १० लाखांचे दारू बॉक्स आणि रोकड लंपास
जळगाव,;- शहरात उन्हाळ्याची सुरुवात होताच चोरट्यांनी आपली सक्रियता वाढवली असून, मंगळवारी रात्री एका रात्रीत दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये ईच्छादेवी चौफुलीजवळील अशोका लिकर गॅलरी या मद्यविक्री दुकानावर चोरट्यांनी मोठा डल्ला मारत सुमारे १० लाख रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूचे १२६ बॉक्स आणि ७० हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे.
भुसावळ येथील रहिवासी अशोकशेठ नागराणी यांचे जळगाव शहरातील ईच्छादेवी चौफुलीजवळ महामार्गालगत दारू विक्रीचे दुकान आहे. दररोजप्रमाणे मंगळवारी रात्री त्यांनी दुकान बंद करून घरी परतले होते. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी शटर उचकवून दुकानात प्रवेश केला.
चोरट्यांनी दुकानातील गल्ल्यातील ७० हजार रुपये रोख रक्कम आणि १२६ बॉक्स देशी-विदेशी महागडी दारू चोरली आहे. एकूण चोरीची किंमत सुमारे १० लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे, चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डिव्हिआर चोरून नेला.
घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, जिल्हापेठ पोलीस आणि एलसीबी यांच्या पथ्काने यांनी घटनास्थळी भेट दिली. फॉरेन्सिक टीमने ठसे व अन्य पुरावे गोळा केले असून, अधिक तपास सुरू आहे. मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली चोरी ही पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरली आहे.