
राज्य पोलीस दलातील चार वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज गृह विभागाच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२(एन) नुसार, चार वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची बदली करून त्यांना नवीन पदस्थापना देण्यात आली आहे. गृह विभागाने यासंदर्भात ९ मे २०२५ रोजी अधिकृत शासन आदेश जारी केला.
या बदल्यांची अंमलबजावणी आस्थापना मंडळ क्र. १ च्या शिफारशींच्या आधारे व संबंधित सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे. शासन आदेश गृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर डिजिटल स्वाक्षरीसह प्रसिद्ध करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, चार वरिष्ठ भा.पो.से. अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून, त्यामध्ये सुनिल रामानंद, राजकुमार व्हटकर, के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना आणि प्रवीण साळुंके या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
त्यांच्यासाठी नव्या पदस्थापना पुढीलप्रमाणे करण्यात आली आहे:
सुनिल रामानंद : नियोजन व समन्वय विभागातून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे
राजकुमार व्हटकर : प्रशिक्षण व खास पथके विभागातून राज्य राखीव पोलीस बल, मुंबई येथे
के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना : प्रशासन विभागातून प्रशिक्षण व खास पथके विभागात
प्रवीण साळुंके : लोहमार्ग विभागातून महामार्ग सुरक्षा विभागात
या बदल्यांमुळे राज्याच्या पोलीस व्यवस्थापनात नव्या जबाबदाऱ्यांसह अधिक प्रभावी कार्यपद्धती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे बदल निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.