
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचा १००% निकाल
आशा वर्करचा मुलगा प्रथम, अंध फिजिओथेरपिस्टच्या मुलीचं अधिकारी होण्याचं स्वप्न
जळगाव, (प्रतिनिधी) – “शिक्षण हीच खरी प्रगतीची किल्ली” हे पुन्हा एकदा सिद्ध करत भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या इयत्ता १० वी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. विशेष म्हणजे सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाले असून, अनेक जणांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश मिळवलं आहे.
आशा वर्करच्या मुलाने केलेली कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली. मोहित गजानन पाटील याने ९२ टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर आई शिवणकाम आणि आशा वर्कर म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. “आईच्या संघर्षाला मी माझ्या यशातून उत्तर दिलं,” अशी भावना मोहितने व्यक्त केली.
प्रेम पावसे (९२%) दुसरा, तर जान्हवी सोनवणे आणि रिया नेमाडे (९१.६०%) तृतीय क्रमांकावर राहिल्या. मिताली नाथ आणि घोषिता पाटील (९१%) यांनी चौथा क्रमांक पटकावला. अंध फिजिओथेरपिस्ट जयंत पाटील यांची कन्या घोषिता हिने मिळवलेलं यश विशेष लक्षवेधी ठरलं. “मुलीचं अधिकारी होण्याचं स्वप्न आता सत्यात उतरेल,” असं भावुक होत जयंत पाटील म्हणाले.
या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन आणि अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “शाळेच्या स्थापनेपासून शंभर टक्के निकालाची परंपरा यंदाही कायम आहे. प्रतिकूल परिस्थितीतील विद्यार्थ्यांची जिद्द प्रेरणादायी आहे,” अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी दिली.
या वर्षी एकूण १६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असून १० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळवले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवलं आहे.