
गणेशोत्सव मिरवणुकीत शांतता भंग करणाऱ्या तिघांविरुद्ध कारवाई ; एकाला चॉपरसह अटक
शनिपेठ पोलिसांची कारवाई
जळगाव: गणेश चतुर्थीच्या मिरवणूक बंदोबस्तादरम्यान शहरात शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन तरुणांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका तरुणाच्या ताब्यातून घातक शस्त्र (चॉपर) जप्त करण्यात आले असून, तिघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीनिमित्त शहरात गणेशोत्सव मिरवणूक सुरू होती. यासाठी पोलीस हवालदार दीपक मनोहर गजरे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले आणि एक पथक घाणेकर चौक ते वाल्मिक नगर दरम्यान बंदोबस्तासाठी तैनात होते.
रात्री सुमारे १० वाजता भिलपुरा चौक ते घाणेकर चौकादरम्यान, महानगरपालिकेच्या शाळेजवळ तीन इसम हातात झेंडे घेऊन गोंधळ घालत असल्याचे पोलिसांना दिसले. ते रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना दमदाटी करत होते. सार्वजनिक शांतता भंग करत असल्याचे लक्षात येताच, पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली.
चौकशीत त्यांनी आपली नावे भूषण शिवनाथ सावरकर (वय २१), रोहन विजय नाथ (वय २५) आणि संदिप विजय नाथ (वय २८) अशी सांगितली. हे तिघेही तांबापुरा, जळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्या वर्तनावर संशय आल्याने पोलिसांनी दोन पंचांना बोलावून त्यांची अंगझडती घेतली.
या झडतीदरम्यान, संदिप विजय नाथ याच्या कमरेला पाठीमागे प्लास्टिकच्या आवरणासह एक चॉपर (पाते आणि प्लास्टिकची मूठ असलेले धारदार शस्त्र) लपवलेला आढळून आला. पोलिसांनी ५०० रुपये किमतीचा हा चॉपर जप्त केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याबद्दल संदिप विजय नाथ याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) चे उल्लंघन १३५ नुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस हवालदार दीपक गजरे, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले, पोलीस अंमलदार अमोल वंजारी, पराग दुसाने, उज्वला पाटोळे, गजानन वाघ यांच्यासह होमगार्डचाही सहभाग होता.
.





